अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश करणाऱ्या एजंटांना आता नो एन्ट्री करण्यात आली असून नागरिकांना मार्गदर्शन करण्याकरिता आरटीओ कार्यालयाकडून प्रशासकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातच प्रवेशद्वाराबाहेरील अतिक्रमणावरही कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ श्री.कृ.वाढेकर यांनी सांगितले. अमरावतीमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक वर्षांपासून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या एजंटचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. वाहनाच्या परवान्याबाबत नागरिक आरटीओ कार्यालयात जात होते. मात्र प्रवेशद्वारावरच वाहनधारकांना एजंटचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या परवानाचे काम करण्याची जबाबदारी एजंट घेत होते. काम करुन देण्याकरिता नागरिकांकडून पैसे उकळले जात होते. या प्रकाराला आरटीओ अधिकारी व नागरिक त्रस्त झाले होते. मात्र नुकताच परिवहन आयुक्तांच्या आदेशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारभार बदलल्याचे चित्र सोमवारी सकाळी पाहायला मिळाले. रविवारी आरटीओ कार्यालयाबाहेर शेकडो एजंट उभे असल्याचे दिसून आले. त्यांना विचारणा केली असता, कार्यालयाच्या आत आता एजंटना नो एन्ट्री करण्यात आली आहे. त्यामुळेच आम्ही बाहेर उभे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. याबाबत आरटीओ वाढेकर यांच्याची संवाद साधला असता, आजपासून एजंटचा प्रवेश निषेध करण्यात असून नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी एक प्रशासकीय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. एजंटाना नो एन्ट्री केल्याने सोमवारी बहुतांश नागरिक स्वत:ची कामे स्वत:च करताना आढळून आले आहे. (प्रतिनिधी)
आरटीओत एजंटना 'नो एन्ट्री'
By admin | Published: January 19, 2015 11:59 PM