लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाशिक येथे ट्रॅव्हल्स आणि टॅंकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भीषण अपघातानंतर शासन, प्रशासन ‘इन ॲक्शन’वर आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी सकाळपासूनच ट्रॅव्हल्सची तपासणी युद्धस्तरावर चालविली आहे. दरम्यान, एका खासगी बसची तपासणी केली असता, फिटनेसप्रकरणी २२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारून ऑनलाइन चालान जारी करण्यात आले. आरटीओच्या फिरत्या पथकाने मोर्शी, नागपूर महामार्गावर दिवसभरात सुमारे १४ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली. यात तीन खासगी वाहनांना दंड आकारला. एका वाहनचालकाकडे अपुरी कागदपत्रे होती तर एका वाहनाचा फिटनेस योग्य नसल्याबाबत दंड आकारण्यात आला आहे. तिन्ही वाहनांना ४८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्याबाबतचे ऑनलाइन चालान जारी करण्यात आले आहे. आता अमरावती येथून ये-जा करणारी खासगी वाहने, ट्रॅव्हल्स व वाहनांची तपासणी केली. शनिवारी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखाच्या ट्रॅव्हल्सला फिटनेसबाबत २२ हजार ५०० रुपयाचा दंड आकारला.
रिंगरोडवर रात्रीला तपासणीअमरावती शहराला वळण घेऊन जाणाऱ्या नागपूर रिंगरोडवरील प्रत्येक ट्रॅव्हल्सची कागदपत्रे, फिटनेस, अग्निशमन यंत्रणा, प्रवासी सुविधांची चाचपणी रात्रीही केली जाणार आहे. तसेच खासगी बस, ट्रॅव्हल्स संचालकांना वाहनांची फिटनेस तपासणी अनिवार्य राहील, यासाठी आरटीओ नोटीस बजावणार आहे. विनाफिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित केला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते यांनी सांगितले.
नाशिक येथील अपघाताची घटना दुर्दैवी आहे. मात्र ट्रॅव्हल्स अथवा खासगी वाहनांची तपासणी निरंतर सुरुच राहील. अगोदर सुद्धा अपूर्ण कागदपत्रे अथवा नियम डावलून रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी पंधरा वाहनांची तपासणी करण्यात आली.- सिद्धार्थ ठोके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी