अमरावती : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६४ प्रवासी बसेसच्या संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही कारवाई आरटीओच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळी ६ वाजतापर्यंत केली. यावेळी आरटीओने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेअंतर्गत विनापरवाना अथवा परवान्यांच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्य मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर्सल इंडिकेटर, टेल लाईट, वायपर आदी बाबांची या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. वाहनांत बेकादेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक व मोटार वाहन कर तसेच शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिमी भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारण्यासंदर्भात सदर कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते, सहायक प्रादेशिक परिवहन राज बागरी, एआरटीओ प्रशांत देशमुख, एआरटीओ सिद्धार्थ ढोके, मोटर वाहन निरीक्षक अशफाक अहमद , एस. यू. पवार, जी. बी वरूटे, पी. आर. सरोदे, आर. आर . रावते, पी. ए. राऊत . पी. पी. दौड, व्ही. एस गुल्हाणे, जे. एम शेलार, एच. एम खराबे, एन. ए. दहेकर, बी. बी. पाटील. यांनी कारवाई केली. सदर गुन्हे दोषी आढळेल्या वाहन चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.