.
आषाढी वारी, विदर्भातून एकमेव मानाची पालखी, अमरावती आगाराकडून बसची सुविधा
अमरावती : कोरोनाकाळातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पायी वारीला शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीला निघणाऱ्या मानाच्या पालखींपैकी कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीचा प्रवास यंदा ‘लाल परी’ने होणार आहे. अमरावती आगार त्यासाठी सुसज्ज बस उपलब्ध करणार आहे.
आषाढी एकदशीनिमित्त विठुनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. यामुळे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ‘लाल परी’ धावणार आहेत. त्यात कौंडण्यपूर (ता. तिवसा) येथील रुक्मिणीमातेच्या पालखीचा समावेश आहे. हे तीर्थक्षेत्र रुक्मिणीचे माहेर आहे. त्यामुळे या माहेरच्या पालखीला पंढरपूरला विशेष मान आहे. या पालखीद्वारे पांडुरंगाला नैवेद्य दिल्या जातो तर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी संस्थानकडून या पालखीला आहेर केला जातो. गावोगावची वारकरी मंडळी या पालखी सोहळ्यात जुळतात.
----------------------------
परिवहन मंत्र्यांच्या सूचना
एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केल्या आहेत.
-----------------
वाखरीपर्यंत प्रवास
कौंडण्यपूर येथून १८ जुलै रोजी ‘लाल परी’तून पंढरीसाठी ही वारी निघणार आहे. त्याकरिता अमरावती आगाराने नि:शुल्क बस उपलब्ध केली आहे. पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास बसमधून होणार आहे. त्यानंतर मानाच्या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील.
-------------------
वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व बस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक, अमरावती
जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ