अमरावती : जिल्ह्यात कन्हान वाळू वाहतूक-विक्रीला लगाम असताना हल्ली मोठ्या प्रमाणात कन्हान वाळूची वाहतूक होत आहे. परंतु महसूल अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने वाळू तस्करांना रान मोकळे झाले आहे.नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीतून वाळू अमरावती शहरात आणली जात आहे. दोन ब्रास इतक्या क्षमतेची वाळू वाहनातून येणे अपेक्षित आहे. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक कन्हान वाळू आणली जात असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे हेरुन वाळू तस्करांनी कन्हान वाळू साठवून ठेवण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. शहरात वेगवेगळ्या मार्गाने कन्हान नदीतून वाळू आणली जात आहे. ही वाळू अन्य वाळूपेक्षा स्वस्त दरात विकली जात आहे. तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी व तहसीलदार आदी महसूल अधिकाऱ्यांचे वाळू तस्करीकडे दुर्लक्ष होत आहे. महिनाभरापासून कन्हान वाळू तस्करी, नियमबाह्य वाहतूक फोफावली आहे. शहरात विविध ठिकाणी वाळू साठवून ठेवली जात असताना या अड्ड्यांवर कारवाई केव्हा करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चोरट्या मार्गाने क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणली जात आहे. कन्हान व वर्धा नदीतून नियमबाह्य वाळू येत असून लाखोंचा महसूल बुडत आहे. वाळू तस्कर मात्र गब्बर झाले आहेत. नोटाबंदीनंतर काही दिवस बांधकामे थांबली होती. मात्र, या परिस्थितीत सुधारणा होत असून बांधकामांना पुन्हा वेग आला आहे. १० ते १२ चाके असलेल्या ट्रकद्वारे क्षमतेपेक्षा अधिक कन्हान वाळूची वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल व पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याप्रकारावर तातडीने अंकुश लावण्याची गरज असून कन्हान वाळू तस्करांवर अंकुश लावण्याची गरज आहे. महसूल अधिकारी निवडणुकीत व्यस्तपोलीस ठाणेनिहाय व्यवहार?कन्हान वाळूच्या नियमबाह्य वाहतुकीपोटी वाळू तस्करांकडून नागपूर ते अमरावती असा प्रवास करताना पोलीस ठाणेनिहाय व्यवहार ठरल्याची विश्वसनीय माहिती आहे. नियमबाह्य वाळू तस्करीच्या वसुलीसाठी पोलिसांकडून दलाल नेमण्यात आले आहेत. कन्हान वाळूची नियमबाह्य वाहतूक करणारे ट्रक, वाहनांची यादी देखील पोलीस ठाण्यात असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्यावाहनांचे व्यवहार नियमित आहेत, त्यावाहनातून नियमबाह्य वाळू वाहतूक होत असली तरी ती वाहने पोलिसांकडून थांबविली जात नाहीत, हे विशेष.नियमबाह्य वाळू वाहतूक करणाऱ्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल. क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. निवडणूक कामातून मुक्त होताच ‘रिझल्ट’ दिसेल.- सुरेश बगळे,तहसीलदार, अमरावती
कन्हान वाळूची नियमबाह्य वाहतूक, तस्करांना रान मोकळे
By admin | Published: February 20, 2017 12:01 AM