लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : शहरासह जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे लसीकरण केंद्र जवळजवळ बंदच आहेत. साठादेखील तोकडा आहे. त्यामुळे जिथे ही लस उपलब्ध होईल तिथे नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या बडनेरा जुन्या वस्तीतील हरिभाऊ वाठ लसीकरण केंद्रात ही लस उपलब्ध असल्याने अमरावतीहून शासकीय कर्मचारी व नागरिकांनी बडनेराकडे धाव घेतल्याने या केंद्रात अचानक गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या १० ते १२ दिवसांपासून लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर लसीकरण सुरू आहे चावडी चौकातील या केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लसीकरण केले जात असल्याची माहिती येथील नोडल अधिकारी राहुल माहुरे यांनी दिली. येथील लसीकरण केंद्रांवर अमरावती शहरासह साईनगर, गोपालनगर, नवाथे व लगतच्या ग्रामीण परिसरातील लोक लस टोचून घेण्यासाठी येत आहेत. येथे लसींचा पुरवठा वाढविण्यासोबतच एखादे जास्तीचे केंद्र सुरू करण्याची गरज देखील निर्माण झाली आहे. नव्या वस्तीच्या मोदी दवाखान्यात फक्त कोविशिल्ड हीच लस दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर लस कोणती, याविषयी ठळकपणे लिहिले जाणे महत्त्वाचे आहे.
लसीचा ठणठणाटज्या अधिकारी, कर्मचारी व नागगरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, त्यांनाच प्राधान्याने दुसरा डोस देणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे व ज्यांना २८ दिवस पूर्ण होत आहे त्यांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी जाण्याची सूचना महापालिका प्रशासनाद्वारा केल्यानंतर गर्दीत भर पडली आहे.
लसींसाठी पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा
अमरावती : कोरोना आजारावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसींचा साठा बुधवारी संपला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४० ते ५० टक्के केंद्रांवर दुपारी १२ वाजता लस नव्हती. सोमवारी २५ हजार लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका, खासगी रुग्णालये, ग्रामीण भागात २३, ४५० लसींचे वाटप करण्यात आले होते. बुधवारी बहुतांश केंद्रावर लसींचा ठणठणाट होता. पुन्हा दोन दिवस लसींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यासाठी आरोग्य सहसंचालकांकडे चार लाख लसींची मागणी केली आहे. मात्र, पुणे येथे लस उपलब्ध नसल्याची माहिती वरिष्ठांनी दिली. बुधवारी उशिरा रात्री कळणार आहे.- दिलीप रणमले, डीएचओ