अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दुसऱ्यांदा सुरू झाला त्या मार्च, एप्रिल ते ५ मे या ६६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३५५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील वृद्धांचे आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९१, तर एप्रिल महिन्यात १७९ व १ ते ५ मे या दरम्यान ८५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाने गतवर्षी मार्च, एप्रिलमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर बरीच आकडा वाढतच गेला. जुलै महिन्यात दोन ते चारच्या घरात जाणारे बळी सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात वाढले होते. कोरोनाच्या या लाटेत सर्वात जास्त फटका बसला तो वृद्ध व्यक्तींना. पहिल्या लाटेत तरुणाई कोरोनापासून लांब होती. एखाद्या तरुणाचाच मृत्यू झाल्याचे पुढे येत होते. मात्र, एप्रिल महिन्यात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेचा विळखा तरुणांनी भोवती घट्ट होत चालला आहे. ३० ते ५० वयोगटाच्या बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनची शक्यता यामुळे सध्याची परिस्थिती अधिक धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनापासून संरक्षणाच्या त्रिसूत्रीचे पालन न केल्यास कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची धोका आणखी वाढला आहे. गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५५२ मृत्यू झाले आहेत. यामध्ये ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला आहेत. मार्च ते ५ मे पर्यंत ३१ ते ४० वर्षे वयोगटातील ३० जणांचा मृत्यू झाला.
बॉक्स
असे आहेत वयोगटानुसार मृत्यू
० ते ३० वर्ष- ११
३१ ते ४० वर्ष-३०
४१ ते ५० वर्ष -५१
५१ ते ६० वर्ष -७१
६० वर्षांवरील - १९२
एकूण - ३५५