झुंबड : महापरिनिर्वाण दिनाची वाढली लगबगअमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर दर्शनासाठी जाणाऱ्या अनुयायांची गर्दी होणार आहे. परिणामी मुंबईमार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांत १ डिसेंबरपासून प्रचंड गर्दी वाढली आहे. शुक्रवारी अमरावती रेल्वेस्थानकावर मुंबई एक्स्प्रेसवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.दरवर्षी विदर्भातून डिसेंबरमध्ये मुंबईमार्गे जाण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची गर्दी वाढते. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे जाण्यासाठी जत्थेच्या जत्थे वाढू लागले आहे. अचानक आंबेडकरी अनुयायांची गर्दी वाढल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांनी मुंबईचा प्रवास तुर्तास थांबविला आहे. आरक्षण डब्यासह सामान्य डब्यांतही आंबेडकरी अनुयायी प्रवास करीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडत आहे. हावडा-मुंबई मेल, हावडा-मुंबई गीतांजली, हावडा-कुर्ला एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस आदी मुंबई मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढत आहे. मध्य रेल्वे विभागाने मुंबईहून परतीच्या प्रवासासाठी मुंबई, कुर्ला व दादर येथून सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)मुंबई एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल नाहीअमरावती- मुंबई (अंबा) एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे वाणिज्य निरीक्षक व्ही. डी. कुंभारे यांनी दिली. १५ डिसेंबरपासून मुंबई येथून ही गाडी २२ डब्यांची धावणार आहे. या गाडीचे नियंत्रण, देखभाल हे मॉडेल रेल्वे स्थानकावरच होईल. मुंबई एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल होणार नाही, ही बाब रेल्वेने विभागाने स्पष्ट केली. या निर्णयाने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई रेल्वे गाड्यांत गर्दी
By admin | Published: December 05, 2015 12:21 AM