- प्रदीप भाकरे/ मनीष तसरेमार्डी (अमरावती) : ‘कधी कधी माझ्या शरीरात दैवी शक्तीचा संचार होतो, त्यावेळी मला भान राहत नाही आणि मी गरम तव्यावर बसतो, मला स्वत:लाही कळत नाही, असा दावा करणारा तथाकथित गुरूदास बाबा मार्डीतून ‘रफू चक्कर’ झाला आहे. त्याच्या भक्तिधामच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागले असून, बाबा नर्मदा परिक्रमेला गेला आहे, कधी येणार माहीत नाही, असे मागच्या दारातून सांगितले जात आहे. रविवार, गुरुवार व दर पौर्णिमेला भरणाऱ्या बाबांच्या दरबारात व्हायरल व्हिडिओनंतर शुकशुकाट पसरला आहे.
सुनील जानराव कावलकर ऊर्फ श्री संत सच्चिदानंद गुरुदास बाबा या ४६ वर्षीय तथाकथित बाबांचा खालून जाळ लावलेल्या तव्यावर बसून शिव्या देणारा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी भक्तिधामची झाडाझडती घेतली. मात्र, बाबा पोलिसांसमक्ष आला नाही. सेवेकऱ्यांकडून तथाकथित बाबा २३ मार्चला रात्री दरबारानंतर नर्मदा परिक्रमेला गेल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी ‘लोकमत’ने मार्डी गाठून ग्रामस्थांना बोलते केले. त्यावर बाबांत सत्त्व होते, तर त्यांनी पोलिस चौकशीला सामोरे जायला हवे होते.
आताच बाबाला नर्मदा परिक्रमा का आठवली, असा सवाल व्यक्त केला. कारला रस्त्यावरील त्याच्या विस्तीर्ण आश्रमाच्या प्रवेशद्वाराला कुलूप होते, तर मागून प्रवेश सुरू होता, हे विशेष. तव्यावर बसून घाणेरड्या शिव्या देणे बाबांना शोभणारे नाही. स्वत:ला संत, सच्चिदानंद म्हणवून घेणाऱ्या बाबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारावे, ३० लाखांचे बक्षीस जिंकावे, असे लोक म्हणतात.
दोन गाई अन् चार वासरं
येथे केवळ दोन गायी, चार वासरे आढळली. गुरुदास बाबाने तेथे भला मोठा सभामंडप उभारला आहे. पाच ते सहा एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या गुरुदास बाबाच्या भक्तिधाम संस्थानमध्ये बाबासाठी सुसज्ज असा पाळणा असृून, त्यावर बसून बाबा दरबार भरवितात.
तव्यावर बसून दरबार भरविणारा गुरुदास बाबा गायब झाला असून भक्तिधामलाही कुलूप लावल्याचे दिसत आहे. ‘लोकमत’च्या चमूने बाबांच्या संस्थानातील एकाला देणगीबद्दल विचारणा केली. एक तरुण पैसे घेऊन पावती देण्यासाठी सरसावला असताना दुसऱ्याने लगेच पावती कशाला, पैसे दानपेटीतच टाका, असे सांगितले.