नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) :वाघाच्या शिकारी व मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपयोजना केल्या जात आहेत. परंतु, मेळघाटात त्याचे विपरीत स्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात मेळघाट, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाटात अस्तित्वात आलेले व्याघ्र संरक्षण कृती दल बेपत्ता झाले आहे. त्यातील १०३ वनरक्षक मुख्य उद्देश सोडून दुसरीकडे वळविण्यात आल्याचा, तर दलासाठी खरेदी केलेले वाहन भंगारात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के वाटा खर्चून राज्यात ताडोबा, पेंच व मेळघाटात स्थापित करण्यात आलेल्या व्याघ्र संरक्षण कृती दलाचे अस्तित्व मेळघाटातून बेपत्ता झाले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी या दलाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, मेळघाटात हे दल शोधूनही दिसत नाही.
मेळघाटातील तीनही दल बेपत्ता
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट, सिपना व गुगामल या तीनही वन्यजीव विभागातील व्याघ्र संरक्षण दलात प्रत्येकी ३० वनरक्षक व नऊ वन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोट, सेमाडोह, ढाकणा व नंतर चिखलदरा येथे या दलाच्या वसतिगृह व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
वाघांची सुरक्षा धोक्यात टाकून गुंतविले दुसरीकडे
मेळघाटातील आदिवासी युवक व युवतींना एसटीपीएफ दलात संधी देण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जंगलात कॅम्प करून तेथेच मुक्कामी राहण्याचे सोडून सामान्य वनरक्षकाप्रमाणे त्यांना बीटमध्ये नेमणुका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
कुठे, किती अस्तित्व उरले?
३० वनरक्षकांपैकी अकोट, गुल्लरघाट येथे चार महिला, सेमाडोह, चिखलदरा येथे प्रत्येकी सात महिला वनरक्षक असल्याची माहिती आहे. या तीनही दलांसाठी अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नसून ढाकणा वजा चिखलदरा येथील पदभार आरएफ प्रफुल ठाकरे, तर सेमाडोह येथील सम्राट मेश्राम यांच्याकडे आहे.
सोळा लाखांचे वाहन भंगारात
एसटीपीएफ दलासाठी १६ लाख रुपये खर्च करून २०१७ साली वाहन खरेदी करण्यात आले. हे वाहन सात महिने चालविल्यानंतर परतवाडा येथील सिपना वन्यजीव विभागाच्या कार्यालयामागे भंगार अवस्थेत पडून आहे.
मेळघाटचे शिकार प्रकरण देशभर गाजले
मेळघाटात गत काही वर्षांपूर्वी झालेल्या वाघाचे शिकार प्रकरण देशभर गाजले. शिकाऱ्यांना शिक्षाही झाली. शिकारीमुळे येथे वाघांची संख्या वाढत नाही, असा कयास लावून जंगलतोड, वाढते अतिक्रमण, मध्य प्रदेशातून शिकाऱ्यांना वाव या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी पेंच, ताडोबाच्या धर्तीवर एसटीपीएफ निर्माण करण्यात आले. त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याचा उद्देश होता. परंतु, नेमणूक झाल्यावर शंभरावर एसटीपीएफच्या जवानांना दुसरीकडे गुंतविण्यात आले.