अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर जोरदार तयारी सुरु झाली असून, प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना नवी नियमावली पाठविली आहे. यात प्रामुख्याने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवताना तितकेच अंतर शिक्षकांनासुद्धा बंधनकारक केले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत शाळा सुरू असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २७ जानेवारीपूर्वी पाचवी ते आठवीपर्यत वर्ग सुरू करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून शाळा संचालक, मुख्याध्यापकांना गाईडलाईनचे नवे पत्र पाठविले आहे. कोरोना संसर्ग रोखणे अथवा विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्य, वस्तू खरेदीबाबत सूचना दिल्या आहेत. मुलांना मास्क खरेदी करण्यासाठीसुद्धा आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाचवी, सहावी, सातवी अथवा आठवीचे वर्ग शिक्षक, शिष्यवृती शिक्षकांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. कोराेना चाचणी अहवाल शाळा किंवा मुख्याध्यापकांकडे सादर करावा लागणार आहे. वर्ग किंवा शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. मास्क नसल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. १८ जानेवारी २०२१ शासननिर्णयाचे शाळांना पालन करणे आवश्यक आहे. १५ जून, २४ जून, २२ जुलै, १७ ऑगस्ट, ८ सप्टेबर, २९ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर २०१९ च्या शासन आदेशाचे शाळांना पालन करणे बंधनकारक केल्याची माहिती प्राथमिकच्या उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.
-------------------------
समग्र शिक्षा अभियानातून साहित्य खरेदी
शाळांसाठी आवश्यक असलेले थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क, साबण खरेदी ही समग्र शिक्षा अभियानातून करावी लागणार आहे. वर्ग खोल्यांचे निर्जतुकीकरणासाठी लागणारे औषध हे ग्रामपंचायती किंवा शाळांना खरेदी करावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
---------------------
विद्यार्थ्यांची जागा बदलणार नाही
वर्गखोलीत एकदा ज्या जागेवर विद्यार्थी बाकावर बसेल तीच जागा नियमित ठेवली
जाणार आहे. डेस्क किंवा बाकावर झिगझॅग पद्धतीने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ताप आणि ऑक्सिजन नोंद ठेवावी लागणार आहे.
-----------------
- मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक
- वर्गात इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांचे अध्ययन
- ऑनलाईन शिक्षणातून अन्य विषय शिकविले जातील.
- जास्त संख्येच्या शाळेत ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने हजर असतील.
- शाळा किमान तीन तास तर कमाल चार तास भरेल.
- शाळांमध्ये मुले एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
- परिपाठ नाही, गर्दी नाही वही, पेन, साहित्याची देवाणघेवाण नाही.