अमरावती : साईबाबा ट्रस्टच्या आॅडिट रिपोर्टमध्ये घोळ असून ट्रस्टची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी तक्रार माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी धर्मदाय सहआयुक्तांकडे केली होती. मात्र, त्यांनी ट्रस्टला सहकार्य करीत तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तक्रार अर्ज नस्तीबध्द केल्याचा आरोप ढगे यांनी केला आहे. यासंदर्भात सहायक धर्मदाय आयुक्तांची मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांकडे ढगे यांनी तक्रार केली आहे. साईनगरातील साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे विलंबाने आॅडिट रिपोर्ट सादर केला. यात घोळ असल्याचा आरोप अविनाश ढगे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी माहिती अधिकारात माहिती मिळवून ट्रस्टच्या आॅडिटमध्ये तफावत असल्याचे सिद्ध केले. आॅडिट रिपोर्टमधील वर्षांची आकडेवारी मागेपुढे केली असून विलंबासाठी ट्रस्टने निरर्थक कारणे दिल्याचा ढगे यांच्या निर्देशनास आले. यासंदर्भात साईबाबा ट्रस्टच्या आॅडिट रिपोर्टची चौकशी करून योग्य कारवाई व्हावी, अशी लेखी तक्रार ढगे यांनी धर्मदाय सहआयुक्तांकडे केली होती. या प्रकरणात सहायक धर्मदाय आयुक्तांनी साईबाबा ट्रस्टची पूर्ण चौकशी न करताच ढगे यांचा तक्रार अर्ज नस्तीबध्द केला, असा आरोप ढगे यांनी केला आहे. त्यांनी मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांना तक्रार केली असून तक्रारीत सहायक आयुक्त यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ढगे यांनी मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांना पाठविलेल्या तक्रारीत केली आहे. ढगे यांनी रजिस्टर पोस्टाने तक्रार मुंबई पाठविली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने मत जाणून घेण्याकरिता अमरावती येथील सहायक आयुक्तांशी 'लोकमत'ने संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केलेत मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
सहायक धर्मदाय आयुक्तांविरोधात तक्रार
By admin | Published: November 08, 2015 12:20 AM