मोर्शी : विचारांतून क्रांती घडत असते. समाजाला जोडण्याचे काम तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता हे सर्व महामानवांच्या विचारातून होत असते. सामाजिक परिवर्तनासाठी बसवेश्वर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ज्या समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरा होत्या, त्याच काळात बसवन्ना (बसवेश्वर) घडले. माणसाने प्रगती केली. परंतु, माणुसकी सोडली आहे. बसवन्नांच्या विचाराने माणसांना परिवर्तनाची दिशा दाखविली, असे प्रतिपादन लातूर येथील शिक्षक भीमराव पाटील यांनी केले.
कोरोनाकाळात शिक्षक हा नैराश्यात जाऊ नये, त्याच्या विचारांना चालना मिळावी, यासाठी शेंदूरजनाघाट येथील जनता गर्ल्स हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक अतुल पडोळे व जरूड येथील वसंतराव नाईक हायस्कूलच्या शिक्षक सुषमा मानेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प " महात्मा बसवन्नाची सामाजिक क्रांती" या विषयावर भीमराव पाटील यांनी गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण कस्तुरे (नांदेड) हे होते. बसवेश्वरांनी समाजात सुधारणा करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात केली. त्यांनी एकेश्वरवादाचा स्वीकार केला, असे भीमराव पाटील म्हणाले. कार्यक्रमाला अनेक शिक्षक-पालक ऑनलाईन उपस्थित होते. संचालन विजय सरगर (कोल्हापूर), स्वागत नाना डोंगरे (सोलापूर), सोमनाथ मठपती (परभणी) व आभार प्रदर्शन सोनटक्के (अहमदनगर) व वैशाली आडमुठे मॅडम (सांगली) यांनी केले.