प्रशांत काळबेंडे
जरूड : सोशल मीडियाचा उपयोग समाजोपयोगी ठरू शकतो, हे पुन्हा एकदा वरूड तालुक्यात सर्वधर्मीय जनतेने दाखवून दिले. कोविडच्या या महामारीत गरीब-गरजू रुग्णांचे प्राण औषधविना जाऊ नये, असा संकल्प घेऊन व्हॉट्सॲप ग्रुपवर केलेल्या आवाहनाला ग्रुप सदस्यांनीही पाठिंबा देऊन एक भरघोस रक्कम जमा करून मेडिकल बँकची संकल्पना प्रत्यक्षात उतरिवली.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याच्या रुग्णसंख्येच्या साधारणत: ३० टक्के रुग्ण वरूड तालुक्यातील आहेत. हे लक्षात घेऊन गरीब रुग्ण औषधांपासून वंचित राहू नये, त्यांचा प्राण जाऊ नये म्हणून तालुक्यातील विवेक बुरे, डॉ. प्रवीण चौधरी, नितीन खेरडे, रितेश शाह, लोकेश अग्रवाल, किशोर तडस, संजय बेलसरे, सोनल चौधरी या मंडळींनी समाजमाध्यमातून मदतीचे आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू झाला. या मदतीतून परिसरातील गरीब गरजू कोविड रुग्णांना औषधोपचार सुलभ व्हावा, या उद्देशाने मेडिकल बँक सुरू करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत औषधे पुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.