- गणेश वासनिकअमरावती - राज्यातील कारागृहांत विविध उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या बंदीजनांना २० ऑगस्टपासून पगारवाढ लागू आली आहे. बंद्यांची सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, बंद्यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये नागरिक म्हणून पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कौशल्याचे मूल्यमापन पगारवाढीद्वारे करण्यात येणार आहे.
कारागृहातील विविध उद्योगांमध्ये बंदी हे अनेक दिवसांपासून कार्यरत आहेत. कामगारांसाठी ठराविक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होते. याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी, हा प्रस्ताव होता. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांनी २० ऑगस्ट २०२३ पासून कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्व बंद्यांना पगारवाढ लागू करणेबाबत आदेश जारी केले आहेत. कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी सात हजार बंदी काम करतात. यामध्ये पुरुष बंदी ६३००, तर महिला बंदी ३०० च्या घरात आहेत. या पगारवाढीचा लाभ अंदाजे सात हजार बंद्यांना होईल. आता असा मिळेल उद्योगी कैद्यांना पगार१) कुशल बंदी -७४/-रुपये२) अर्ध कुशल बंदी -६७/- रुपये३) अकुशल बंदी -५३/-रुपये
आधुनिक साधनसामग्रीच्या साहाय्याने कारागृह उद्योगांचे नूतनीकरण व्हावे आणि बंद्यांना आधुनिक उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कारागृहात नवनवीन आधुनिक उद्योग सुरू करण्याचे व रोजगारनिर्मिती वाढविण्यात येत आहे.- डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह मुख्यालय (येरवडा, पुणे)