मोर्शी, अचलपूर तालुक्यातील प्रकार : मंडळाने ते जमीन पट्टे केले रद्दअमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान मिळालेल्या व तत्कालिन समित्यांद्वारा भूमिहिनांना वाटप करण्यात आलेल्या जमिनींची सर्रास विक्री होत आहे. अचलपूर व मोर्शी तालुक्यात भूदान जमिनीची विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने भूदान यज्ञ मंडळाने ते जमीन पट्टे रद्द केले. मात्र शासनाने ही जमीन अद्यापही मंडळाच्या नावे केली नाही. यात महसूल यंत्रणेचे हात ओले झाल्याचा आरोप होत आहे.भूदान यज्ञ समितीने मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई भाग-१ येथील गट नं. १४९/१ अंतर्गत २.०३ हेक्टर क्षेत्राचे ८ मार्च १९५५ मध्ये नेरपिंगळाई येथील अहमदशा रहिमशा फकीर यांना वाटप केल्याची हक नोंदणी रजिष्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यामधील ०.९६ हेक्टर जमीन अहमदशा यांनी नसीरबेग नजरूबेग यांना विकली. याचा फेरफार २१ जानेवारी १९८१ मध्ये घेण्यात आला. भूमीस्वामी नसीरबेग यांनी ती जमीन बनाबाई गोपाळराव पांडे यांना विकली. त्यानंतर बनाबाईच्या वारसदारांनी १८ जुलै २०१४ रोजी ती जमीन प्रमोद रामराव सुरजूसे यांना विकली व याचा ३ डिसेंबर २०१४ रोजी क्रमांक १७८० मध्ये फेरफार घेण्यात आला. याप्रकरणी भूदान मंडळाचे शर्तभंग झाला असल्याने हा जमिनीचा पट्टा तत्काळ प्रभावाने रद्द करण्याची मागणी भूदान यज्ञ मंडळाने तहसीलदार मोर्शी यांच्याकडे केली व ही जमीन मंडळाच्या नावे वर्ग करण्याची मागणीदेखील भूदान यज्ञ मंडळाचे सचिवांनी केली आहे.महसूल प्रशासनाची डोळेझाकअमरावती : अन्य दुसऱ्या प्रकरणात अचलपूर येथील कमलाकर देशमुख यांनी ४.८४ हेक्टर शेती १९५८ मध्ये भूदान यज्ञ मंडळाला दिली व मंडळाने शिंदी (बु.) येथील शामराव इंद्रभान लहाने यांना ती शेती वाहितीसाठी दिल्याची नोंद ४ एप्रिल २०१२ मधील सातबाऱ्यावर आहे. भोगवट वर्ग मंडळाच्या नावे आहे. शामराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रामराव हे शेताचे वाहितदार झाले. त्यांनी यापैकी ३.३२ हेक्टर शेतीची २० डिसेंबर १९८२, १० जानेवारी १९८३ व २४ जानेवारी १९८३ मध्ये सुधाकर भोरे यांना विक्री केली व सातबाऱ्यावर सुधाकर कृष्णराव भोरे यांचे नाव आहे. या प्रकरणात भूदान मंडळाचे नावाने खोट्या नोंदी घेऊन व्यवहार केल्याचा मंडळाचा आरोप आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असता निवडणूक प्रक्रिया अन्यत्र कर्तव्यावर असल्याचे सांगितले.काय म्हणतो कायदा ?भूदान जमिनीचा पट्टा प्राप्त झालेला इसम हा भूदान अधिनियम १९५३ अन्वये ‘भूदानधारक’ म्हणून नोंदविला जावा, अशी स्पष्ट सूचना आहे. मात्र महसूल प्रशासनाने अशा नोंदी सातबाऱ्यावर घेतल्या नाहीत. भूदान जमिनीची विक्री अथवा भाड्याने देऊ शकणार नाही, अशी अट भूदान कायद्याचे कलम २४ (सी) व (डी) मध्ये नमूद आहे. मात्र जिल्ह्यात मोजक्याच सातबाऱ्यावर अशी नोंद आहे.भूदान मंडळाचे नावे जमीन करावी वर्गभूदान यज्ञ समितीने वाहितदार लहाने यांचा वाहितीचा अधिकार रद्द करून अचलपूर तहसीलदारांनी ही जमीन मंडळाचे नावे वर्ग करावी. अंजनगाव सुर्जी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नियमबाह्य नोंदणी तत्काळ प्रभावाने रद्द कराव्या व भूदान जमिनीच्या सातबाऱ्यावर ‘भूदान-अहस्तांतरणीय’ अशी नोंद करण्याची मागणी मंडळाचे जिल्हा प्रभारी नरेंद्र बैस यांनी केली. याप्रकरणी मंडळाद्वारा माहितीचा अधिकार संपुष्टात आणावा व जमीन मंडळाचे नावे वर्ग करावी. अंजनगाव सुर्जी दुय्यम निबंधक कार्यालयातील चारही नोंदणी बेकायदेशीर ठरवून त्या रद्द करायला पाहिजे.- नरेंद्र बैस,जिल्हा प्रभारी, भूदान यज्ञ मंडळ
भूदान जमिनीची सर्रास विक्री
By admin | Published: February 12, 2017 12:05 AM