अमरावती : सोन्याच्या गिन्न्या स्वस्त दरात विक्री करण्याची बतावणी करून एकास मारहाण करून लुटल्याच्या प्रकरणात एक वर्षापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार, १३ जुलै रोजी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथून अटक केली. शहादेव बाजीराव जाधव (५२, रा. महागाव, अकोला) असे अटक आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, शहादेव व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्याकडे सोन्याचे गिन्न्या असून त्या स्वस्त दरात विक्री करण्याची बतावणी संजय मगनलाल सोनकर (रा. जबलपूर, मध्यप्रदेश) यांच्याकडे केली. व्यवहार निश्चित झाल्यानंतर शहादेव व त्याच्या साथीदारांनी संजय सोनकर यांना नांदगावलगतच्या लोणी ठाण्याच्या हद्दीतील जळू फाटा येथे बोलाविले. त्यानुसार संजय सोनकर हे रोख १ लाख ५० हजार रुपये घेऊन जळू फाट्यावर गेले. त्यावेळी शहादेव व त्याच्या साथीदारांनी संजय सोनकर यांना मारहाण करून त्यांच्या जवळील रोख व दोन मोबाइल असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी संजय सोनकर यांनी २३ जुलै २०२२ रोजी लोणी ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
पिंजरमधून केली अटक
या प्रकरणातील मुख्य आरोपी शहादेव हा घटनेपासून फरार होता. दरम्यान, तो बाजाराचा दिवस असल्याने पिंजर येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तसलीम शेख व मुलचंद भांबुरकर, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, मंगेश लकडे, हर्षद घुसे यांनी केली.