प्रदीप भाकरे अमरावती: ब्रॅन्डेडच्या नावावर डुप्लिकेट घडयाळ विक्रीचा गोरखधंदा खोलापूरी गेट पोलिसांनी हाणून पाडला. स्थानिक जवाहरगेट भागातील शनिमंदिराजवळ असलेल्या डायमंड वॉच या प्रतिष्ठानातून पोलिसांनी सुमारे ६ लाख ७१ हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी १७ एप्रिल रोजी रात्री ९.१४ च्या सुमारास आरोपी घड्याळविक्रेता एजाजखान हिदायतखान (३४, रा. गुलिस्तानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
एजाजखान याच्या दुकानातून ६ लाख ४० हजार रुपये किमतीची फास्टट्रॅकच्या डुप्लिकेट घड्याळे, २७ हजार रुपये किमतीचे २७० डायल व ४९०० रुपये किंमतीचे चष्मे असा एकुण ६.७१ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीने तो माल विक्रीसाठी बाळगला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी ती घड्याळे व चष्मे फास्टट्रॅकचे आहेत, अशी बतावणी करून त्याआड डुप्लिकेट माल विकत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी १७ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास खोलापूरी गेट पोलिसांच्या मदतीने डायमंड वॉच येथे ट्रॅप केला. त्यावेळी तो स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ब्रॅन्डेड कंपनीच्या घडयाळांऐवजी हुबेहुब तशाच दिसणारी घड्याळे विक्रीकरिता बाळगत असताना मिळून आला. याप्रकरणी क्ंपनी प्रतिनिधी गौरव तिवारी (३६, नवी दिल्ली) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी कॉपीराईट कायदयान्वये गुन्हा दाखल केला.