अमरावती : एचटीबीटी बियाण्यांवर प्रतिबंध असतांना विक्रीसाठी साठवणूक केलेला व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाण्यांची ५० पाकिटे व अनधिकृत विद्राव्य खतांचा साठा नेरपिंगळाई येथील बालाजी अॅग्रो एजंन्सी यांच्या गोदामात आढळून आला. या प्रकरणी गुरुवारीउशिरा शिरखेड ठाण्यात मोर्शीचे कृषी विकास अधिकारी यांनी तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी दोंघाविरुद्ध गुन्हा नोंद केला.
कृषि विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख यांचे मार्गदर्शनात तंत्र अधिकारी राजेश जानकार, तालुका कृषी अधिकारी मोर्शी रंजना इंगळे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दादासो पवार व कृषी अधिकारी पंचायत समिती मोर्शी चौधरी यांच्या पथकाने धाड मारली. यामध्ये गोदामात असलेली अनधिकृत एचटीबीटीची ५० पाकीटे अंदाजे किंमत ६७,५०० व बिगर नोंदणीकृत उत्पादने, पाण्यात विद्राव्य खते, असा एकूण ५८७६६० रुपयांचा २५३० किलो साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि ४२० सह बियाण्यांच्या विविध कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.