अनिल कडू
परतवाडा : पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विक्रीस बंदी असतानाही अचलपूर, परतवाड्यात त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली गेली. परतवाडा-अंजनगाव मार्गावरील सपन सावळीलगत सपन नदीपात्रातील वाहत्या पाण्यात रविवारी, १९ सप्टेंबरला भक्तांकडून विधिवत विसर्जित केल्या गेलेल्या या मूर्ती बुधवार २२ सप्टेंबरपर्यंत विरघळल्या नव्हत्या. अशा हजारो मूर्ती नदीपात्रात उघड्या पडल्याचे दिसून आले. या मूर्ती सामाजिक संघटनांसह पोलीस विभागाला गोळा कराव्या लागल्या.
गणेशभक्तांनी पीओपीची मूर्ती विकत घेऊ नये. मातीच्या मूर्तीची पूजा अर्चा करावी आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने मातीच्या मूर्तींचेच अखेरच्या दिवशी विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनासह सामाजिक संघटना दरवर्षी नागरिकांना करतात. काही वर्षांपासून हा प्रयत्न सुरू आहे. तरीदेखील पीओपीच्या मूर्तींची शहरात विक्री केली जावी यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागरिकांची फसवणूक
आम्ही गणेश मूर्ती विक्रेत्यांना मातीचीच मूर्ती मागितली. मातीची गणेश मूर्ती समजून आम्हाला विक्रेत्यांनी पीओपीची मूर्ती दिली. यात विक्रेत्यांकडून आमची फसवणूक केल्याचे मत या अनुषंगाने काहींनी व्यक्त केले.
प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक
या अशा मूर्ती विक्रेत्यांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांवर विक्री पूर्वीच प्रशासनाने कार्यवाही करावी. पीओपीची मूर्ती विकली जाणार नाही यावर नियंत्रण ठेवावे. मातीच्या गणेशमूर्ती रास्त भावात उपलब्ध करून देणाऱ्या विक्री स्टॉलची संख्याही प्रशासनासह सामाजिक संघटनांनी वाढवावी. जेणेकरून नागरिकांना मातीची गणेशमूर्ती सहज उपलब्ध होईल. अशी अपेक्षा या अनुषंगाने नागरिकांनी व्यक्त केली आहे.