-------------
लेहेगाव ग्रामपंचायतला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
मोर्शी : केंन्द्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर लेहेगाव ग्रामपंचायतीने आपली मोहर उमटविली आहे. ही ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. ग्रा.पं. लेहेगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविताना प्रशासकीय नियम व अटींचे पालन करत गावकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यात. गावात वृक्ष संवर्धन व स्वच्छता, शिक्षण, सौरऊर्जेवर भर देण्यात आला.
--------------
रसुलापूर रस्ता बांधकामात निकृष्टतेचा आरोप
चांदूर बाजार : तालुक्यातील रसुलापूर ते धानोरा या डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामात निकृष्ट साहित्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे स्थानिक सरपंच, सदस्यांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. रसुलापूर ते धानोरा हा १.३ किलोमीटर डांबर रस्त्याचे काम सुरू आहे.
--------------
चांदूररेल्वेतील अतिक्रमण जैसे थे
चांदूर रेल्वे : शहरालगत रेल्वे गेटलगतची दुकाने हटविण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रेल्वेगेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रोडला एक फूट लागूनच असून एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने झालेली आहे. शहरातही अतिक्रमणाची तीच परिस्थिती आहे.
-------------------
पावसाळ्याआधी व्हावी मेळघाटातील रस्त्यांची दुरुस्ती
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या सीमारेषा पाहता दोन वर्षांपासून रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. परिणामी खड्डेमय झालेल्या रस्त्यांची परवानगी न दिल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटात दरड कोसळून वाहतूक बंद होते. त्याअनुषंगाने रस्त्यांची डागडुजी पावसाळ्याआधी व्हावी, अशी मागणी होत आहे.
-------------
लॉकडाऊनमुळे दुधविक्रेते संकटात
कावली वसाड : कावली, दाभाडा, वाठोडा या गावात दूध डेअरी असून त्यात हजारो लिटर दूध संकलित करण्यात येत आहे. तसेच गावातील काही तरुण धामणगाव रेल्वे येथे १० ते १२ किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी घरोघरी दूध विकत आहे. मात्र, ९ मे पासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये दूध डेअरीदेखील बंद राहणार असल्याने रोज निघणारे दूध शहरात न्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-------------------
तीन वेळा घ्या वाफ
भातकुली : वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी गोळ्या, झिंक गोळ्या व मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेण्याबाबत आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्य तज्ज्ञांनी सुचविले आहे. दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावयाची आहे. नाकाव्दारे वाफ सोशून शरीरात ओढणे व तोंडावाटे बाहेर काढायची ही प्रक्रिया १० वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेसाठी दोन किंवा ३ मिनिटे लागतात. तसेच साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही उत्तम आहे.
--------------
एकाच दिवशी १ लाख ३४ हजार रुपये दंड वसुली, तहसीलदारांची कारवाई
वनोजा बाग : संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसायाला बंदी असताना सुध्दा येथील बाजारपेठेतील कपडा व्यापारी व इतर व्यावसायिक ग्राहकांना दुकानाच्या आत घेऊन व शटर बंद करून व्यवसाय करीत असल्याची माहिती दोन दिवसाआधी नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार अभिजित जगताप यांना मिळाली. त्यांनी शनिवारी सकाळी बाजारपेठेत धडक दिली असता त्यांना दुकानांचे शटर बंद करून ग्राहकांना आत घेऊन व्यापार करताना आढळले.
नवरंग ड्रेसेस, माहेश्र्वरी कलेक्शन व कृष्णा साडी सेंटर या मोठ्या दुकानांचा यात समावेश आहे. नवरंग ड्रेसेस व माहेश्र्वरी कलेक्शन यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, कृष्णा साडी सेंटरला १३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. मध्यवस्तीतील फरकाळे वाईन शॉपमधून दारू विक्री होत असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप यांना आढळून आल्याने वाईन शॉपला ४० हजार रुपयांचा दंड देण्यात आला. शनिवारी एकूण १ लाख ३४ हजार २०० रुपयांची दंडात्मक वसुली झाली. कारवाईवेळी एपीआय सपकाळ, नायब तहसीलदार पोटदुखे, नगर पालिका पथकप्रमुख पुरण धांडे, विठोबा घोंगे, मंडळ अधिकारी मिरगे, अविनाश पोटदुखे, गजानन पिंपळकर, तलाठी गवई, पोलीस कर्मचाऱी गोपाल सोळंके, न.प. कर्मचारी दादाराव जवंजाळ, फारुक व इतर कर्मचारी होते.