अमरावती : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर इन्फ्ल्यूएंझासदृश रुग्णांचे सर्वेक्षण अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. पोल्ट्री फार्म, कत्तलखाने आदी ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती व पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी या जोखमीच्या गटांतील इन्फ्ल्यूएंझासदृश रुग्णांचे सर्वेक्षण सर्तकतेने करण्यात येऊन संशयितांचे नमुने आता पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) येथे पाठविण्यात येणार आहे.
आरोग्यसेवा संचालनालयाद्वारे याविषयीची कार्यपद्धती प्रत्येक जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन, वनविभाग, आरोग्य आणि कृषिविज्ञान विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यात शीघ्र प्रतिसाद दलामध्ये व्हेटर्नरी डॉक्टरचा समावेश करावा. जिल्हा झुनॉटिक समितीची बौठक घ्यावी व कृती योजना ठरविण्यात यावी, उजनी जलाशय व नवेगाव बांध आदी ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांविषयी दक्षता घ्याव्या आदी सूचना आरोग्य सहसंचालकांनी दिल्या आहेत.
पक्षी स्रावासोबत संपर्क टाळावा, पक्षी, कोंबड्यांचे पिंजरे आणि पाण्याचे भांडे रोज डिटर्जन्ट पावडरने धुवावे, मृत पक्ष्यांना हाताने स्पर्श करूरु नये. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात वारंवार धुवावे, परिसर स्वच्छ ठेवावा, मास्क व ग्लोव्ह्जचा वापर करावा आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉक्स
आयुक्तांद्वारे दक्षतेच्या सूचना
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनीदेखील व्यावसायिकांना व नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच कुक्कुटपालन व्यावसायिक, चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांनीदेखील बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. यासोबतच मृत पक्षी आढळल्यास घ्यावयाची काळजीसंदर्भात नागरिकांना आवाहन केले असून, प्रशासनाचा बैठकीद्वारे आढावा घेतला आहे.