अमरावती: ग्रामीण भागातील ४१ गावांमधील पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. जुलैमध्ये जिल्ह्यात जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.
संबंधित ग्रामपंचायतींना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गावांचे पाणी नमुने पुन्हा दूषित आल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला दिला आहे. राष्ट्रीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यंत्रणेकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काही गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. लोकांना शुद्ध पाणीपुरवठा होऊन साथीच्या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी पाण्याचे नमुने तपासले जातात.
जिल्हा प्रयोगशाळेने आरोग्य यंत्रणेकडे जुलै महिन्याचा पाणी नमुने तपासणीचा अहवाल सादर केला आहे. यात तिवसा तालुक्यातील ७, भातकुली व अमरावती तालुक्यातील प्रत्येकी ६, मोर्शी व वरूड तालुक्यातील प्रत्येकी ४, धारणी तालुक्यातील ३, अचलपूर, धामणगाव रेल्वे, चिखलदरा, चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी २ आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १ जलस्रोत नमुना दूषित आहे.ब्लिचिंग पावडर नमुनेही पाठविले नाहीत
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ब्लिचिंग पावडरचे नमुनेसुद्धा पाठविले नाहीत. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत लेखी पत्र पाठवून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.ज्या गावात दूषित पाणी नमुने आढळले आहेत. अशा गावांना तातडीने जलस्रोताचे नियमित टीसीएल पावडरचा वापर करून पाणी शुद्धीकरण करावे तसेच खबरदारीच्या उपाययोजना करून पुन्हा पाणी नमुने पाठविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.- मनीषा सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी