अमरावती: महसूल यंत्रणेला वाकुल्या दाखवत चालकाने क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेणारा टिप्पर पळवून नेला. विशेष म्हणजे आधी मगरूरी करत टिप्पर मालकाने चावी काढून पळ काढला. तर थोड्यावेळाने चालकाने विना चावीने टिप्पर पळविला. १७ जून रोजी सकाळी ७ च्या सुमारास बिझिलॅन्ड मार्केटच्या प्रवेशदवारावर ही घटना घडली.
याप्रकरणी नायब तहसीलदार टिना चव्हान यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी टिप्पर चालक व मालक गौरव साहिंदे (रा. अमरावती) यांच्याविरूध्द शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, टिना चव्हान, मंडळ अधिकारी विशाल छोटे, तलाठी राजेश दंबे व मंगेश सोळंके, कोतवाल गजानन खंडारे हे महसूल पथक नांदगाव पेठ येथील बिझिलॅड मार्केटसमोर अवैध रेती वाहतुकीबाबत मोहीम राबवित होते. मोहिमेदरम्यान त्यांनी एमएच १२ एसएफ ३१६७ हा रेती वाहून नेणारा टिप्पर थांबविला. त्यात ७.०४ ब्रास रेती दिसून आल्याने पथकाने चालकाला तो टिप्पर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात लावण्याची सुचना केली. महसूल पथक तो टिप्पर ठाण्यात घेऊन जात असताना मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्या टिप्परचा मालक आला. त्याने टिप्परला थांबवून पथकाशी हुज्जत केली. त्यावर नायब तहसीलदारांनी त्याला रॉयल्टी मागितली. त्यावर पाच ब्रास रेती लिहिलेली होती. त्यामुळे टिप्परमध्ये परवानगीपेक्षा अधिक रेती असल्याचे स्पष्ट झाले.
मालक गेला पळूनटिप्पर मालक गौरव साहिंदे याने अचानकपणे टिप्परची चावी काढली व तो पांढऱ्या रंगाच्या कारने तेथून पळून गेला. दरम्यान चालकाने तो टिप्पर विना चावीने सुरु करुन तो देखील टिप्परसह पळून गेल्याने तेथे मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आरोपींनी आपल्या कायदेशीर रखवालीतून टिप्पर पळून नेल्याची व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार चव्हान यांनी नोंदविली.