अमरावती :उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोनात ‘राजा घरी, जनता दारोदारी’ अशी स्थिती होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाताच, उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडताना जसे नवरीने माहेर सोडावं. तसा हा ईव्हेंट केला, अशी बोचरी टीका राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी येथे केली.
मुंबई येथे ५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक मंत्री राज्यभरात शिवसेना हिंदुगर्व गर्जना संपर्क यात्रा राबवित आहे. त्या अनुषंगाने शनिवारी अमरावतीत ना.संदिपान भुमरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदात टीकास्त्र सोडले. सत्तेवर असताना वेगवेगळ्या आजारांची कारणे देत कर्तव्यापासून पळ काढला. लोकांशी संपर्क ठेवला नाही. जणू शिवसेना संपली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने रामबाण इलाज करणारा डॉक्टर भेटल्याने आता सर्वांचा आजार बरा होईल, असा टोलाही ना.भुमरे यांनी लगावला.
सत्तासंघर्षावर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ देणार निर्णय
आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले, याचा शोध घ्यावा. शिवसेनेचे आमदार, खासदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरतमार्गे गुवाहाटीचा मार्ग धरला. आता आम्ही समाधानी आहाेत. कारण मुख्यमंत्री शिंदे आमचा फोन उचलतात. त्यांना आम्ही थेट भेटू शकतो. जनतेची कामे करता येतात. आम्ही गद्दार नाही. आम्ही प्रतिकार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास धरली. मात्र, येत्या २७ सप्टेंबर रोजी राज्याच्या सत्ता संघर्षावर न्यायमूर्तीचे पाच घटनापीठ निर्णय देतील, अशी शक्यता ना.भुमरे यांनी वर्तविली.