उज्वल भालेकर / अमरावती: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी सोमवारी गाडगे महाराज यांची वेशभूषा साकारत जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. सरकारच्या डोक्यात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेली जळमटं दूर करण्यासाठी ही मोहीम राबविल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने सहभागी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतरही त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. पुन्हा एकदा ते सत्तेत आहेत, परंतु मागील २७ दिवसांपासून कंत्राटी अधिकारी, कर्मचारी हे आपल्या न्याय अधिकारासाठी आंदोलन करत असतानादेखील त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनास सुरुवात केली आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांनी गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, भारत मातेची वेशभूषा साकारत जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबवत आंदोलन केले. यावेळी शेकडोच्या संख्येने कंत्राटी अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये दिलेला शब्द पाळण्याची मागणी यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली. मंगळवारी संप मंडपात भजन व थाळीनाद आंदोलन करून झोपलेल्या सरकार माय-बापाला जागे करणार असल्याचे यावेळी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी सांगितले.