अमरावती : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार संजय बंड हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. ‘बघा, बघा कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा जयघोषांनी सच्चा शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला. सर्वपक्षीयांनी संवेदना व्यक्त करताना बंड यांचा सामाजिक, राजकीय प्रवास उलगडला. हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्यात. माजी आमदार संजय बंड यांचे गुरुवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यानंतर श्रीविकास कॉलनी येथे त्यांच्या निवासस्थानी चाहते, आप्तस्वकीय, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. दुपारी ३ वाजता फुलांनी सजवलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. निवासस्थानाहून पुढे अंत्ययात्रा सायंस्कोर मैदान, राजकमल चौक, गांधी चौक होत हिंदू स्मशानभूमीत पोहचली. दरम्यान, अंत्ययात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यात आले. अंत्यविधीचे सोपस्कार आटोपताच मुलगा स्वराज याने जड अंतकरणाने पित्याच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ यांनी संवेदना व्यक्त केल्यात. दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावतीने आमदार आशिष जयस्वाल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात. संजय बंड यांनी सलग तीन वेळा वलगाव मतदारसंघाचे विधिमंडळात नेतृत्व केले. आमदार सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. रवि राणा, आ. अरूण अडसड, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, आ. वीरेंद्र जगताप, आ. अनिल बोंडे, आ. श्रीकांत देशपांंडे, महापौर संजय नरवणे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, नाना नागमोते, दिनेश बूब, सुनील खराटे, राजेश वानखडे, सोमेश्र्वर पुसदकर, दिनेश वानखडे, गजानन वाकोडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख, प्राचार्य आर.डी. सिकची, धनंजय पाटील यांच्यासह राज्यभरातून शिवसेनेचे जिल्हा व शहरप्रमुख आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले व अंत्ययात्रेत सहभागी झाले.
संजय बंड अनंतात विलीन; साश्रू नयनांनी निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 7:56 PM