अमरावती : दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदासाठी ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके हे मैदानात उतरणार आहेत. ते शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी संचालकपदासाठी नामांकन दाखल करतील. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी खोडकेंना हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.
तब्बल ११ वर्षानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने सहकार क्षेत्रातील नेते, दिग्गज एकवटले आहेत. वर्षाला दोन हजार कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेवर संचालकपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. दोन पॅनेलमध्ये थेट निवडणूक होईल, असे संकेत आहेत. मात्र, संजय खोडके हे स्वत: ओबीसी प्रवर्गातून संचालकपदासाठी मैदानात उतरणार असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण तापले असून, नामांकन दाखल करण्याला वेग आला आहे. उमेदवारांना ६ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे.