अमरावती : शिवसेनेची सुरु असलेली वाताहतीला जबाबदार संजय राऊत आहेत. त्यांनी शिवसेना फोडण्याची सुपारी घेतली आहे. शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी त्यांनी २०० कोटी रुपये घेतले. उगाच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन टीआरपी वाढण्याचे काम राऊत यांनी करु नये, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी शनिवारी अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेतून केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमानिमित्त आमदार नितेश राणे हे शुक्रवारपासूनच अमरावतीमध्ये आले होते. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनेक दंगली घडविल्या. दंगलीशिवाय आपण मुख्यमंत्रीच होऊ शकत नाही, असे वक्तव्य देखील त्यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या दंगली प्रकरणी उद्धव ठाकरे यांचीच नार्काेटेस्ट करायला पाहिजे, अशी टिका त्यांनी केली.
तसेच २०१४ पासून शिवसेनेची सुरु असेलेली वाताहत याला जबाबदार हे संजय राऊत असून त्यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करण्यासाठी २०० कोटी रुपयांची सुपारी घेतली आहे. त्यामुळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन राऊत यांनी स्वत:चा टीआरपी वाढवू नये, त्यांनी स्वत:ला किती मध्ये विकले हे सांगावे, २०० कोटी घेतले की नाही याची माहिती द्यावी. राऊत यांच्याकडे येणारा पैशा हा दलालीतूनच येत असल्याची जोरदार टीका नितेश राणे यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेला आमदार प्रविण पोटे पाटील, शहराध्यक्ष किरण पातूरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदीता चौधरी, सिद्धार्थ वानखडे उपस्थित होते.