गणेश वासनिक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना हमखास रोजगार, नोकरी मिळेल, असा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता समितीचे गठण झाले असून, यात विविध विद्याशाखांच्या सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते. मात्र, त्याच्या तुलनेत या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगार, नोकरीच्या संधी कमीच आहेत. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परंपरागत अभ्यासक्रमांना फाटा देत बदलत्या काळानुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचा समावेश असावा, असे स्पष्ट केले आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अमरावती विद्यापीठाने विषय अभ्यासक्रम (थिअरी), बहुपर्यायी प्रश्नसंच (मल्टिपल चॉइस) व कौशल्याधारित (स्किलबेस्ड मोड्यूल) अशा तीन प्रकारांमध्ये नव्या अभ्यासक्रमात स्थान देण्याबाबत विद्वत परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. नव्या अभ्यासक्रमात काय असावे, काय असू नये, याचा निर्णय गठित समिती घेईल. विद्यार्थ्यांना रोजगार, नोकरी, पसंतिक्रम, सर्वेक्षण, इंटरर्नशिप, स्पर्धा परीक्षा, संवाद, टुरिझम, इतिहास, राजकारण अशा विविधांगी बाबींना अभ्यासक्रमात स्थान दिले जाणार आहे. त्यानुसार गठित समितीला लवकरच नव्या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाला अहवाल सादर करावा लागणार आहे.
प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना नवा अभ्यासक्रम लागू
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे.
५०, ३०, २०; प्रश्नांचा फॉर्म्युला
नव्या अभ्यासक्रमात विविधांगी बाबींना स्थान देत असताना विद्यार्थ्यांना रोजगार आणि नोकरी मिळेल, याला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रश्नांची वर्गवारी करताना ५०, ३० व २० असे गुण मिळणार आहेत.
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात बदल होत आहेत. विविध विद्याशाखांच्या सदस्याचा समावेश असलेली समिती गठित झाली आहे. कुलगुरूंच्या मार्गदर्शनात ही समिती कार्यरत आहे.
- अविनाश मोहरील, अधिष्ठाता, मानव्य विज्ञान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.