लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना या जीवघेणी आजारावर मात करून १४ दिवस होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्नेहानुबंध अभियान राबविणार आहे. कोरोना रुग्णांचे मानसिक समुपदेशन आणि त्यांना लागणारे सेवा कार्य पुरविले जाणार आहे. विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजनेचा याकरिता संयुक्त पुढाकार असणार आहे. विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये हा अभियन उपक्रम राबविला जाणार आहे.
कोविड- १९ आजाराने सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, जे रुग्ण पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह झाले, त्यांना सामाजिक, मानसिक, शरीरिक व आरोग्यदृष्ट्या करावा लागणारा सामना हा आव्हानात्मक ठरणारा आहे. त्यामुळे विद्यापीठाने होम क्वारंटाईन रुग्णांसाठी स्नेहानुबंध अभियानाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधून अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प घेतला आहे. त्याकरिता अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियानासाठी समुपदेशक असलेले प्राचार्य, प्राध्यापक हे कोरोना रुग्णांशी थेट संवाद साधतील. होम क्वारंटाईन रुग्णांना योग्यरित्या मानसिक समुपदेशन करणे, त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी समुपदेशकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.सामाजिकदृष्ट्या आधार देण्याचा प्रयत्नकोरोना रुग्णांना सामाजिकदृष्ट्या व्यवस्थित वागणूक दिली जाते. कुटुंबियांकडून योग्य सहकार्य मिळत नाही. १४ दिवस घरी विलगिकरणात असताना रुग्णांना खबरदारी घ्यावी लागते. मात्र, या काळात रूग्ण तथा कुटुंबियांना मानसिक ताण-तणावात जगावे लागते. रुग्णांकडे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि साहित्य पोहचवायला कोणी धजावत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना मानसिक समुपदेशनासह मदतीसाठी विद्यापीठ धावून जाणार आहे.कोरोना रुग्णांना मानसिक समुपदेशन, सेवा कार्य पुरविण्यासाठी स्नेहानुबंध अभियान हे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबविले जाणार आहे. त्याकरिता जिल्हानिहाय नियोजन झाले असून, पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह रुग्णांना मानसिक आधार दिला जाईल. यात जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.