अमरावती : बाधित साडेतीन हजार शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीसाठी दाखल केलेल्या पूर्वसूचनांपैकी बहुतांश पीक विमा कंपनीद्वारा फेटाळण्यात आल्या. ‘लोकमत’ने ही बाब जनदरबारात मांडताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींना फटकारले व लेखी पत्र देवून तंबी दिली. याशिवाय तांत्रिक कारणांसह खूलासादेखील मागितला आहे.
मार्चअखेर जिल्ह्यास दोन वेळा अवकाळीसह गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे सात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा, स्ट्राबेरी, भाजीपाला, मका, उन्हाळी मूग यासह संत्रा, मोसंबी, लिंबू व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. यासाठी पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या साडे तीन हजार शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या केल्या, यापैकी तीन हजारावर पूर्वसूचना अर्ज पीक विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले आहे. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच कृषी विभागाने याची गंभीर दखल घेतली.
पीक विमा कंपनीला याविषयी कृषी विभागाद्वारा पत्र देण्यात आलेले आहे. या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात याव्यात व पंचनामे करण्याच्या सूचना एसएओ अनिल खर्चान यांनी दिल्या. याशिवाय बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांच्या आधारे बाधित पिकांची पाहणी करण्याच्या सूचना कंपनी प्रतिनिधीला देण्यात आल्या.