अमरावती : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या मस्टरवर स्वाक्षरी करून अनुदान मिळवून देण्यासाठी १५ हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामभाऊ गणपतराव गाडेकर (६४, माहुली चोर) असे लाचखोराचे नाव असून, ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत.
सरपंच गाडेकर याने तक्रारदार व त्यांच्या तीन सहकाऱ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे एकूण १ लाख २० हजारांची लाच मागितली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ५ हजारांप्रमाणे एकूण २० हजार मागितले. त्यापैकी ५ हजार आधीच स्वीकारले. तर, उर्वरित १५ हजार रुपये घेताना गाडेकर याला माहुली चोर येथेच १ जुलै रोजी रंगेहाथ पकडण्यात आले. गाडेकरने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उप-अधीक्षक गजानन पडघन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अमोल कडू, ना.पो.शी युवराज राठोड, अंमलदार शैलेश कडू, राजेश कोचे यांनी हा सापळा यशस्वी केला.