अमरावती : जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता उपसरपंच निवडीचे वेध लागले आहेत. यासाठी पहिली विशेष सभा २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या सभेतील मतदान प्रक्रियेत सरपंच यांना सहभाग होता येणार आहे. याशिवाय उपसरपंच निवडीत समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचाही अधिकार सरपंच यांना आहे. त्यामुळे अनेक गावातील समीकरण बिघडणार आहे.
जिल्ह्यातील एक सरपंच बिनविरोध तर १९ थेट जनतेमधून निवडून आलेले आहेत. या सरपंचांना काही विशेषाधिकार अधिनियमाने प्राप्त आहेत. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३३ मध्ये सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीची कार्यपद्धती विषद करण्यात आलेली आहे.
यानूसार उपसरपंच निवडीच्या सभेत सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष आहेम व त्यानसार उपसरपंचाची निवडणूक घेणे हा सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे. उपसरपंचपदाची निवडणूक सभा तहकूब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम १९६४ चा नियम १२ मधील तरतुदीनुसार ती सभा दुसऱ्या दिवशी घेण्यात येते. याशिवाय पहिल्या सभेत सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असल्यास जिल्हाधिकारी खातरजमा करतील व तत्काळ पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहेत. त्यामुळे उपसरपंच यांची निवड होऊन पंचायतीचे गठन होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.