देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात तहसीलदारांनी २५ ऑगस्टला या बांधकामाला परवानगी दिली आणि ११ सप्टेंबर २०२१ ला त्या ठिकाणी दोन मजली इमारत उभी ठाकली. अवघ्या तेरा दिवसात उभ्या राहिलेल्या या बांधकामात १३ सप्टेंबरला सैनिक कॅन्टीनचे लोकार्पण आहे. त्यासाठी पत्रिका तयार केल्या गेली. या पत्रिकेवर देवमाळीच्या सरपंच पद्मा सोळंके यांचे नाव प्रमुख अतिथीमध्ये टाकले गेले. सोळंके यांनी ११ सप्टेंबरला कार्यक्रमाच्या आयोजकांना ग्रामपंचायतकडून एक पत्र दिले. न विचारता कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझे नाव कसे टाकले, याविषयी त्यांना विचारणा केली. आपल्या बांधकामाविषयी ग्रामपंचायत देव माळी यांच्यामार्फत तक्रारी सुरू आहेत. आपल्या प्लॉट विषयी अजूनही संभ्रम आहे. बांधकाम अनधिकृत आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद करून पत्रिकेवरून स्वतःचे नाव कमी करण्यास आयोजकांना सुचविले.
आयोजकांनी आता दुसरी कार्यक्रम पत्रिका बनवली. या दुसऱ्या पत्रिकेत सरपंचाच नाही, पण राज्यमंत्री बच्चू कडू, अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची नावे आहेत. ग्रामपंचायतकडून या बांधकामासह प्लॉटवर आक्षेप नोंदविल्या गेलेल्या पत्रांवर ग्रामपंचायत सचिवांचीही स्वाक्षरी आहे.