हौशी खगोल अभ्यासक : टेलिस्कोपने दिसणार विलोभनीय दृश्यवैभव बाबरेकर अमरावतीसूर्य मालिकेतील सर्वात सुंदर शनी हा ग्रह ३ जून रोजी पृथ्वीजवळ येणार असून यावेळी शनीच्या कड्याचे (रिंग) अवलोकनदेखील करता येईल. टेलिस्कोपच्या साहाय्याने हे विलोभनीय दृश्य बघता येईल, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली. ३ जून रोजी शनी ग्रह अगदी सूर्यासमोर राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी-शनी या ग्रहांचे अंतर सरासरीपेक्षा कमी असते. त्यामुळे या काळात शनीचे सुंदर असे कडे अगदी चांगल्या प्रकारे पृथ्वीवरून दिसू शकते. अत्याधुनिक दुर्बिण व टेलिस्कोपच्या साहाय्याने हा दृश्य बघावे लागणार आहे. यापूर्वी २३ मे २०१५ रोजी शनी-सूर्याची प्रतियुती झाली होती. शनिला ६१ चंद्र असून सर्वात मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० किमी. आहे. या ग्रहावरील तापमान शून्याखाली १८० सेंटीग्रेड असते. शनीचे रिंग २ लाख ७० हजार किमीपर्यंत पसरलेले असते. हे रिंग बर्फाचे आहे. शनिचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे. पृथ्वी ज्यावेळी शनीच्या विषुववृत्त पातळीत असते. अशावेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्याप्रकारे दिसू शकत नाही. ३ जून रोजी सूर्य मावळ्यावर लगेच शनी ग्रह पूर्व क्षितीजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितीजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. तो काळसर व पिंगट रंगाचा अतिशय चमकदार दिसणार असल्याने तो सहजरीत्या ओळखता येईल. हा ग्रह पृथ्वीजवळ आल्यावर मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या घटनेनंतर १५ जून २०१७ रोजी शनी पुन्हा पृथ्वीजवळ येईल. सूर्यमालेतील सुंदर दिसणाऱ्या शनी व पृथ्वीची ३ जून रोजी प्रतियुती होणार आहे. यावेळी शनीच्या रिंगचे विलोभनीय दृश्य टेलिस्कोपद्वारे पाहता येणार आहे. याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. -विजय गिरूळकर, हौशी खगोल अभ्यासक
शनी ग्रह ३ जूनला येणार पृथ्वीजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 12:37 AM