विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे : मोर्शी येथे एलईडी बल्बचे वितरणअमरावती : विजेची बचत करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. विजेची बचत करून काटकसरीने विजेचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित नागरिकांना केले. मोर्शी येथील वीज कार्यालयात एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे, येथील महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हरिभाऊ बागडे म्हणाले, विजेचा वापर आणि विजेचे उत्पादन यात दिवसेंदिवस तफावत दिसून येत आहे. विजेचे उत्पादन कमी व विजेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. दैनंदिनी जीवनात वीज हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे विजेची बचत करणे हा प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाचा विषय असला पाहिजे. तसेच विजेची गळती थांबली पाहिजे. गावांमध्ये शेतकऱ्यांना वीज कमी प्रमाणात प्राप्त होते. ज्या प्रमाणात वीज प्राप्त होते त्यामध्ये त्यांना शेतात मोटार चालवणे शक्य होत नाही त्याचे कारण हेच की जुन्या मोटारींना वीज अधिक प्रमाणात लागते. त्यासाठी शासनाने सौर ऊर्जेतून वीज तयार करण्याचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विद्युत विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या विजेची वाट पहावी लागणार नाही. प्रारंभी बागडे यांच्या हस्ते महादेव चिखले, बाळकृष्ण मानकर, डी. एम. धोटे या वीज ग्राहकांना एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)
विजेची बचत करणे काळाची गरज
By admin | Published: November 21, 2015 12:10 AM