वरुड : कृषी विभागाच्या दक्षता पथकाने तालुक्यातील दोन कृषी साहित्य विक्री केंद्रावर धाड घालून २ लाख १५ हजार १८० रुपये किमतीचे बनावट बियाणे जप्त केले. ही कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. दक्षता पथकाने बीजी-२ कपाशीच्या बियाण्यांचे २३० बनावट पाकिटे जप्त केली आहेत. याप्रकरणी वरुड पोलिसांनी औरंगाबादच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात घोराड येथे गत आठ दिवसांपूर्वी आर.आर.बी.टी कपाशी बियाणे विक्रेत्यावर कृषी विभागाने कारवाई केली होती. यामध्ये वरुड येथील शीतल कृषीसेवा केंद्र आणि जरुडचे रोशन कृषीसेवा केंद्रावर बनावट बीजी-२ कपाशी बियाणे विकली जात असल्याची कुणकुण दक्षता पथकाला लागली होती. यामुळे काही दिवसांपूर्वी माल विक्री बंद केली होती. परंतु २५ जूनच्या रात्री साडेआठ वाजतादरम्यान विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी जी.टी. देशमुख, कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक मनोहर पाटेकर, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक पुरुषोत्तम कडू, पंचायत समिती कृषी अधिकारी पंकज वानखडे, इमेज क्रॉप सायन्सेस कर्णूल (आ.प्र)यवतामळचे विभागीय व्यवस्थापक आशिष दाते, सचिन शहा यांच्या पथकाने हे धाडसत्र राबविले. यामध्ये जरुड येथील रोशन कृषी सेवा केंद्र येथे ५८ बी.जी कापूस बियाण्यांच्या ५८ बनावट पाकिटे आणि वरुड येथील शीतल कृषिसेवा केंद्रातून १७२ बनावट पाकिटे असे प्रती ४५० ग्रॅम वजनाची एकूण २३० पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त केलेले कपाशी बियाणे हे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. औरंगाबाद येथील प्राई अॅग्रो प्रा.लि.यांनी इमेज क्रॉप सायन्सेस कर्णूल (आंध्रप्रदेश) यांच्या डायमंड बी.जी-२ या कंपनीचे एस.आर.सी.एच-३३ या कपाशी वाणाची बनावट पाकिटे तयार करुन विक्रेत्याला विकण्यासाठी दिली. सदर कृषी दुकानदाराकडे रीतसर बिले आणि पावत्या असल्याने औरंगाबादच्या प्राई अॅग्रो प्रा.लि. विरुद्ध लेखी तक्रार नोंदविली. यावरुन वरुड पोलिसांनी औरंगाबादच्या प्राई अग्रो प्रा.लि. या कंपनीविरुद्ध भांविचे कलम ४२०, आर.डब्ल्यू ६३ कॉपीराईट अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरुड तालुक्यात सव्वादोन लाखांचे बनावट बियाणे जप्त
By admin | Published: June 26, 2014 11:02 PM