लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कामगार उपायुक्त कार्यालयाकडून बालकामगारांची सुटका करण्यात येते. यापूर्वी अशा अनेक कारवाया झाल्यात. मात्र, सामाजिक विषमता, आर्थिक दुर्बलता आणि बालकामगाराशी संबंधित कायद्याची बोथट झालेली धार अशा विविध कारणांमुळे बालकामगाराचा प्रश्न दिवसेंदिवस जटीलच होत चालला आहे. अमरावती जिल्ह्यात सन २०१७ ते जुलै २०२१ या साडेचार वर्षात केवळ ७ मालकांवर खटले दाखल करण्यात आले.
बालकामगार विरोधी कायदा अंमलात आला असला, तरी लहान मुले-मुली हॉटेलात कपबशा धुताना, तसेच धोकादायक ठिकाणी कामे करताना सर्रासपणे आढळून येतात. बालकामगार प्रथा हा समाजाला लागलेला कलंक आहे. मात्र, सरकारी पातळीवरून प्रयत्न करूनही हा जटील प्रश्न सामाजिक परिस्थितीमुळे अधिकच गंभीर बनत चालला आहे. देशभरातील बालकामगांराच्या सरंक्षणासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात.
काय सांगतो बालकामगार प्रतिबंधक अधिनियम?
वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध घालणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेषतः, १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियेत कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या, किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेतून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे. नियमभंग करणा-याना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत र १०,००० ते र २०,०००/- दंड होऊ शकतो. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी "राष्ट्रीय बालकामगार योजना" राबवण्यात आलेली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाद्वारे बेकायदेशीरपणे महिला, तरुणींना चुकीचे काम करायला लावणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना प्रतिबंध घालण्यात येतो. या कक्षाच्या पथकाने नुकत्याच दोन कारवाई करून अनैतिक व्यवसायाशी संबंधित पीडित तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. पाच जणांना ‘पीटा‘ कायद्याखाली अटक करण्यात आली.
- शिवाजी बचाटे, प्रमुख,
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष
येथे बालकामगार काम करीत नाहीत... पाटी केवळ नावालाच
लॉ कॉलेज चौक
येथील एका चहाटपरीवर बालकामगार चहा देताना दिसतो. घरी कमावता कुणीही नसल्याने १००/१५० रुपयांसाठी काम करावे लागते, हेच एक काम विनासायास व कुणाच्याही ओळखीविना मिळत असल्याची प्रतिक्रया त्या बालकामगाराने दिली. येथील लॉ कॉलेज परिसरातील चहाटपरीवर तो हमखास दिसतो.
केडियानगर चौक येथील महापालिकेच्या उद्यानाजवळ स्वच्छता करणारा बालकामगार आढळतो. तो त्याच्या पालकासमवेत या भागात सफाई करताना दिसतो. मात्र, तो कुणाच्या अखत्यारित काम करतो, हे कळू शकले नाही.