लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून परस्पर लक्षावधीची रक्कम काढली जात असल्याने खातेदारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आपलीही मोठी रक्कम परस्पर काढली जाईल, या भीतीने शेकडो खातेदारांनी एसबीआयकडे धाव घेऊन खात्यातील रक्कम काढण्याची एकच घाई केली. यामुळे सोमवारी एसबीआयच्या श्याम चौक आणि कॅम्प स्थित शाखांमध्ये विड्रॉलसाठी मोठी गर्दी दिसून आली.एसबीआयचे अधिकारी विड्रॉलच्या वाढलेल्या संख्येला दुजोरा देत नसले तरी रक्कम लंपास होण्याच्या वाढत्या घटनांमुळे एसबीआयच्या विश्वासार्हता नक्कीच धोक्यात आल्याचे चित्र आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या जिल्ह्यात एकूण ५२ शाखा असून, या सर्व कॅम्प स्थित क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्या अखत्यारीत आहेत. श्याम चौकातील मुख्य शाखा नागपूरला जोडली गेली आहे. एसबीआयचे जिल्हाभरात ११०, तर शहरात २५ एटीएम असल्याची माहिती क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयातर्फे देण्यात आली. आतापर्यंत शहर तथा जिल्ह्यातील एसबीआयच्या १६ खातेदारांच्या खात्यातून १४ लाख रुपये परस्पर लंपास करण्यात आले आहेत. यापूर्वी एटीएमबाबत फोनवर माहिती घेऊन रक्कम काढण्याचे प्रकार उघड झाले होते. मात्र, महिन्याभरापासून एसबीआय खातेदारांच्या खात्यातून अशी कुठलीही माहिती न घेता रक्कम लंपास करण्यात आली आहे. यामध्ये कुठल्या तरी शहरातील एटीएममधून विड्रॉल झाल्याचा संदेश तेवढा मिळतो. यामुळे खातेदारांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरात वारंवार अशा घटना घडत असताना एसबीआयने हात वर केले. १६ पैकी एकाही प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यामुळे एसबीआयचे खातेदारांना त्यांच्या ठेवीची चिंता लागली असून, खात्यातील रक्कम परस्पर लंपास होण्याच्या भीतीने ती बँकेतून काढून घर वा अन्यत्र सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे.बॅक अधिकाºयांचेही चौकशीकडे लक्षएसबीआयच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याबाबत पोलिसांकडे आतापर्यंत १६ तक्रारी प्राप्त झाल्यात. तथापि, पोलीस प्रशासन या गुन्ह्यांच्या खोलापर्यंत जाऊ शकले नाही. दुसरीकडे बँकेत ठेवलेली रक्कमही सुरक्षित नसल्याचे या घटनांमुळे उघड झाल्याने ग्राहकांची ससहोलपट होत आहे. बँक अधिकारीही या प्रकरणात उघडपणे बोलायला तयार नाहीत. आपले लक्ष पोलिसांच्या निष्कर्षाकडे लागले असल्याचा दावा करीत त्यांनी घोंगडे झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे.ॅएसबीआयचा व्याप्ती मोठी असल्याने दैनंदिन व्यवहार नेमके किती कोटींचे होतात, हे सांगता येणार नाही. प्रकरण गंभीर आहे. मात्र, ग्राहकांवर त्याचा परिणाम झालेला नाही.- अश्विन चौधरी,मुख्य प्रबंधक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय.
एसबीआय खातेदारांना पैसे काढण्याची घाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:06 PM
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून परस्पर लक्षावधीची रक्कम काढली जात असल्याने खातेदारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देविश्वासर्हता डागाळली : बँकेकडे आठ लाख खातेदार