लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्मदाखले देणे हा भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा आहे. जन्मदाखले देताना कोणत्याही प्रकारचे जन्मासंदर्भातील पुरावे अधिकाऱ्यांनी तपासलेले नाहीत. अमरावती जिल्ह्यात जवळपास १४ हजार ६४३ जणांनी अर्ज केले आहेत.
त्यातील ८ हजार ३५० जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार सोमवारी परिषदेत केला आहे. भारतीय जन्म-मृत्यू नोंदणी कायदा मध्ये सुधारणानंतर हे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले. यानंतरच बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले देण्यास सुरुवात झाल्याचे सोमय्या म्हणाले.
८ हजार ३५० प्रमाणपत्रांचे वितरण जन्मदाखल्यांसाठी अर्ज करणारे हे ३० ते ७० वर्षे वयोगटातील आहेत. जिल्ह्यात जवळपास १४ हजार ६४३ जणांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्यातील एकानेही जन्मासंदर्भातील पुरावा सादर केलेला नसल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत यातील ८ हजार ३५० जणांना प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. केवळ १४९ अर्जच रद्द ठरले आहेत. त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांची पुन्हा तपासणी करण्याची केलेली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे सोमय्या यांनी पत्र परिषदेत सांगितले.