अमरावती : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, अर्ज करूनही विद्यार्थ्यांचे अर्ज हे महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती विभागात २४ हजार ३२६ विद्यार्थ्यांचे अर्ज हे महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस पाठवून प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. सदर महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी अनु.जाती प्रवर्गासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु तरीही अनेक विद्यार्थ्यांचे अर्जच समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे याची चौकशी केली असता, राज्यातील १ लाख २३ हजार अर्ज हे महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.
महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामार्फत महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज प्राचार्यांनी भरून घेण्यात यावे. यासाठी महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्याचे निर्देश विभागातील सर्व सहायक आयुक्त यांना दिले आहेत. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी समाज माध्यमांचाही वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. सन २०२२-२३ या वर्षात महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतेलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.
असे आहेत जिल्हानिहाय प्रलंबित अर्ज
- अमरावती : ६६७७
- अकोला : ५७८५
- यवतमाळ : ३४८४
- बुलढाणा: ३६२६
- वाशीम : ३५००