अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा यांना ऑनलाइन होणार की, ऑफलाइन याबाबत अद्याप संभ्रम असला तरी एप्रिल महिन्याच्या अखेरीस या परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. या परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाकडून माहिती सादर करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही, याबाबत पालक आणि विद्यार्थी वर्गात तर्कविर्तक लावले जात आहे. काेरोनामुळे पाचवी ते आठवी वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गात विद्यार्थी आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला भीतीपोटी अल्प प्रमाणात विद्यार्थी शाळेत येत होते. आता मात्र संख्या वाढली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन २०२०-२१ फेब्रुवारीच्या दुसर्या किंवा तिसर्या रविवारऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याची तयारी वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. परीक्षा परिषदेमार्फत यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी मार्च-एप्रिलमध्ये शाळास्तरावर शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यार्थी निवडीकरिता मुहूर्त साधला जाणार आहे.
कोट
शिष्यवृत्ती परीक्षा नेमकी ऑनलाईन की, ऑफलाईन याबाबत वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही सुचना नाहीत. मात्र, परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक माहिती वरिष्ठ कार्यालयाने मागविली आहे. त्यानुसार ही माहिती सादर केली जाईल.
- ई.झेड खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक