अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी २३ मे २०२१ रोजी राज्यात होणार होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ही ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास मान्यता दिली. परंतु, ८ ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ८ ऑगस्टऐवजी आता ९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र २७ जुलै रोजी संबंधित शाळांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्थानिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिष्यवृत्ती परीक्षा आता ९ ऑगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:13 AM