अमरावती : पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर आता ८ ऑगस्टला घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे यापूर्वी दोनवेळा ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेने लांबणीवर टाकली होती.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येते. यापूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या राज्य परीक्षा परिषदेच्या प्रस्तावास राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. याच काळात राज्याच्या सर्वच भागात कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याने शासनाने ३० मार्च रोजी पत्र काढून ही परीक्षा २३ मे रोजी घेण्याबाबत मान्यता दिली होती. त्यानंतरही काेरोनाची परिस्थिती न निवळल्याने अनिश्चित काळासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र ही परीक्षा घेण्यावर शालेय शिक्णष विभामाने शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार राज्याचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी याबाबत परीक्षा परिषदेला ८ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.