अमरावती : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून २२ मार्च २०२१ ला एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यातील संपूर्ण शाळा बंदच आहेत. आमची स्थिती खूप भयावह असून, उपासमारीची पाळी आली आहे. आर्थिक संकटामुळे काही स्कूल वाहनचालकांनी आत्महत्यादेखील केली आहे. देव करो, शाळा लवकरच सुरू हो, असा टाहो स्कूल वाहनचालकांचा आहे. एक वर्षापासून शाळांची स्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे आमचा रोजगार गेला आहे. वर्षभरापासून आम्ही आर्थिक संकटाशी लढत आहो. आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. काय करावे अन् काय नाही, अशी स्थिती आहे. आता २६ जूननंतर तरी शाळा सुरू होणे अपेक्षित असून, तशी आशा आम्हाला आहे, असे स्कूल वाहनचालक विजय रगबनसिंग यांनी व्यक्त केले.
बॉक्स
टरबुज, भाजीपाला, कपडे विकण्याची वेळ
राज्यात हजारो तर जिल्ह्यातील दोनशे ते तीनशे स्कूल वाहनचालकांचा रोजगार कोरोनाच्या संसर्गामुळे हिसकल्या गेला आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी टरबुज, भाजीपाला, कपडे आणि अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. पोटाची खळगी बुजविण्यासाठी वाहनचालकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटलेला आहे. विशेष म्हणजे वाहनचालक –मालकांच्या कुटुंबातील महिलांनासुद्धा रोजगारासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
बॉक्स
राज्यात नऊ स्कूल वाहनचालकांची आत्महत्या
राज्यभरातील शाळा बंद असल्यामुळे स्कूल वाहनचालक व मालकांना खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे वाहनचालक मानसिक तणावात आले आहे. या मानसिक तणावातून राज्यभरातील नऊ स्कूल वाहनचालकांनी आत्महत्यादेखील केली आहे. यामध्ये नागपूरमध्ये ४, अमरावती २, चांदुरबाजार १ तर अन्य ठिकाणच्या स्कूल वाहनचालकांचा यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती भगवे वादळ चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य अध्यक्ष अतुल खोंड यांनी दिली.
बॉक्स
आता मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच आत्मदहन करू
स्कूल वाहनचालक व मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वपरीने प्रयत्न केले आहेत; परंतु शासनाला जाग आला नाही. अनेकदा निवेदने दिली, रास्ता रोको आंदोलन केले. मी स्वत: अन्नत्याग आंदोलन केले. माझी प्रकृती गंभीर झाली होती. इतके सर्व केल्यानंतरही शासनाला जाग आली नाही. आता एकच मार्ग आहे. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करू, यासंदर्भात आमची संघटना लवकरच निर्णय घेणार असल्याचे भगवे वादळ चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य अध्यक्ष अतुल खोंड यांनी सांगितले.