विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : कुलगुरुंवर कारवाईची मागणी दर्यापूर : हैदराबाद येथील विद्यापीठात एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद करून करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु आणि केंद्रीय मंत्री यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दर्यापूर येथील वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार व मुख्याध्यापकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तालुक्यातील जे.डी. पाटील महाविद्यालय, उ.ना. लोणकर महाविद्यालय, प्रबोधन शाळा, आदर्श शाळा, शासकीय आयटीआय शुक्रवार रोजी सकाळपासून बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर काही शाळांनी बंदला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. महाविद्यालय बंदला विद्यार्थी व शिक्षकांनी सुद्धा सहकार्य केले. ही घटना पुन्हा घडू नयेत व विद्यार्थ्यांवर कुठल्याही संघटनांचा अन्याय होणार नाही, राजकारण्यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांच्या नावे देण्यात आले. यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध वानखडे, विवेक होले, नमित हुतके, चेतन हंबर्डे, शुभम होेले, किरण अरबट व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापकांशी सकारात्मक चर्चा करून त्यांना विषयाचे गांभीर्य पटविले. (शहर प्रतिनिधी)
दर्यापुरात शाळा बंदला प्रतिसाद
By admin | Published: January 23, 2016 12:40 AM