अमरावती : कोरोना संसर्गामुळे दीड वर्षापासून स्कूल व्हॅन व बस बंद असून जागीच उभ्या आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्कूल बस चालक- मालकांनी अन्य किरकोळ व्यवसाय निवडला आहे. काहींनी भाजीपाला विक्रीचा, तर काहींनी मिळेल तो व्यवसाय निवडला आहे. शाळा सुरू झाल्यास स्कूलव्हॅन चालकाची गाडी पूर्वपदावर येणार आहे.
दीड वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. आता कोरोना कमी झाला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये स्कूलबस चालक-मालकांची उपासमार झाली. चांगले शिक्षण घेत पदवी मिळवून अनेकांनी बँका, खासगी फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेऊन स्कूलबस, स्कूल व्हॅन खरेदी केल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी लॉकडाऊन लागल्यामुळे स्कूल व्हॅनचालकांच्या व्यवसायावर गदा आली. त्यामुळे चालक - मालकावर आर्थिक संकट सापडले आहे. बँकांचे कर्ज कसे फेडायचे, घर खर्च कसा भागवायचा आदी प्रश्न चालक, मालकापुढे उभे ठाकले आहे. वर्ष लोटूनही गाडा पूर्वपदावर येत नसल्याने अनेक चालक - मालकांनी उपजिविकेसाठी इलेक्ट्रिशियन, गवंडी काम, तसेच भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. काही जणांना अंडी, आमलेट विक्रीच्या हातगाड्या लावल्या आहेत. या कामातून होणाऱ्या मिळकतीतून ते कुटुंबाचा गाडा हाकत आहे. दुसरीकडे दीड वर्षापासून अधिक काळ वाहने उभी असल्याने इंजिनचे काम निघत आहे. शहरात पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी साडेसातशेपेक्षा जास्त स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. मात्र, स्कूल व्हॅन बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. तसेच शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असलेल्या स्कूल व्हॅन चालक - मालकांचा शासनाने विचार करावा. कॉन्व्हेंट सुरू करावी म्हणजे आमचा व्यवसायही सुरळीत सुरू होईल, अशी मागणी स्कूल व्हॅन चालक- मालकांतून होत आहे. शासनाच्या निर्णयाकडे चालक- मालकांचे लक्ष लागले आहे.
१) स्कूल व्हॅनमधून केवळ विद्यार्थाची ने- आण करण्याची परवानगी आरटीओ कार्यालयाकडून मिळते. या वाहनाचे अन्य प्रकारची प्रवासी वाहतूक वा साहित्याची वाहतूक करण्यासाठी उपयोग करता येत नाही. त्यामुळे वाहन चालकांना कारवाईची भीती असते.
२) स्कूल व्हॅनचा इतर कामासाठी उपयोग करता येत नाही. तसा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नियमही आहे. केवळ विद्यार्थांनाच व्हॅनमधून ने-आण करता येते. वर्षभरापासून स्कूल व्हॅन जागीच उभी असून एखादा गरीब, गरजू, रुग्णाला वाहन उपलब्ध न झाल्यास स्कूल व्हॅनचा वापर केला जातो.
३) कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा- कॉन्व्हेंमेट बंद आहेत. यामुळे स्कूल व्हॅन जागीच उभ्या होत्या. बर्याच दिवसांपासून वाहन एका जागेवरच उभे असले तर तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. याकरिता खासगी कामासाठी स्कूल व्हॅनचा वापर केला जात आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा - २८८५
जिल्ह्यातील स्कूल व्हॅन - ७५०
स्कूल व्हॅन चालकांची दोन कोट आहे.