अमरावती - शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्या सजविल्या. फुलांच्या पाकळ्यांच्या पदस्पर्शानंतर ताटातील रंगात पाय भिजवून पाऊलखुणा कागदावर उमटविल्या. हा आगळा उपक्रम महापालिकेच्या वडाळीस्थित एसआरपीएफ शाळेत मंगळवारी राबविण्यात आला. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये प्रफुल्लीत वातावरणाची निर्मिती झाली होती. आपल्या पाल्याचा शाळेतील पहिला दिवस पालकांसाठी उत्सुकतेचा असतो. मुलांचे शाळेतील पहिले पाऊल पडताना पालकांच्या चेहºयावर आनंदाचे हावभाव दिसून आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांमध्ये आनंदासोबतच भीतीचेही वातावरण दिसून आले. अशाप्रसंगी शाळेतील वातावरण भीतीमुक्त व प्रफुल्लीत असेल, तर ते विद्यार्थीसुद्धा शाळेत जाण्याची उत्सुकता दाखवितात. मुलांच्या भावना ओळखून त्यांना एक आनंददायी व उत्साहीत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वडाळीतील एसआरपीएफ शाळेने केला. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी व पालकांना नेहमी स्मरणात राहावा, या उद्देशाने मनपा शाळेतील शिक्षकांनी नाविन्यपूर्वक उपक्रम राबविला. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजताच इयत्ता पहिलीतील नवप्रवेशित मुलांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. मुला-मुलींनी शाळेत प्रवेश करताना पायरीवर पाय ठेवला असता, त्यांच्या पायाखाली मऊ असा गुलाब पुष्पांचा पदस्पर्श लाभला. शाळेच्या प्रवेशद्वारावरच गुलाब फुलांच्या पाकल्या अंथरून ठेवल्या होत्या. शाळेत प्रवेश करणाºया विद्यार्थ्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्याचा वर्षाव होत असल्याचे बघून मुले प्रफुल्लित झाली होती. एवढेच नव्हे वधु-वर नवघरी प्रवेश करताना, त्याच्या पाऊलखुणा घेण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे मुलाच्या पाऊल ताटातील रंगात भिजवून एका कागदावर ते उतरविण्यात आले. त्यानंतर मुलांच्या पाऊलखुणांचा तो कागद पालकांना भेट देण्यात आला. शाळा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहून पालकवर्ग गहिवरले. या नवख्या उपक्रमासाठी नगरसेवक आशिष गावंडे, मुख्याध्यापिका प्रिति खोडे, योगेश पखाले, राहुल तायडे, योगेश चाटे, उज्वला भिसे यांनी परिश्रम घेतले असून शाळेचा पहिला दिवस पालकांकरिता चिरस्मरणीय बनविला होता.
शाळेच्या पहिला दिवस सर्वच शाळा साजरा करतात. पण, आम्ही हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केल्याने, त्यांच्यासह पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्मीत झाले होते. - योगेश पखाले, मुख्याध्यापक, महापालिका शाळा. एसआरपीएफ