अमरावती : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेचा नामकरण करण्याचा निर्णय शासनाने ४ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार आता शालेय पोषण आहार योजनेऐवजी आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जाणार आहे. शासनाचे या निर्णयामुळे प्रधानमंत्र्यांशी ही नवीन योजना जोडण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाने सदर योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम- पोषण) असे करून प्रस्तुत योजनेच्या पंचवार्षिक सन २०२१-२२ ते २०२५ -२६ आराखड्यास मान्यता ६ ऑक्टोबर रोजीच्या मार्गदर्शक सूचनांंद्वारे कळविले आहे.
त्यानुसार योजनेच्या नावात बदल करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएस पोषण ) असे केले असल्यामुळे यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जाणार आहे. केंद्र शासनाने योजनेकरिता निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या ६ ऑक़्टोबर २०२१ मधील पत्राप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत.